ऐन दिवाळीत शिमग्याची वेळ : कराडात शिवशंकर नागरी सह. पतसंस्थेला टाळे, पोलिसांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ऐन दिवाळीत कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांवर शिमगा करण्याची वेळ संस्थेने आणली आहे. गेल्या काही दिवसापासून ही पतसंस्था बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची 25 वर्षांपूर्वी कराड शहरात स्थापना करण्यात आली. बहुतांशी व्यापारी वर्ग या संस्थेची जोडला गेला होता. शहरात नावारूपाला असलेल्या या संस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून या पतसंस्थेबद्दल उलट- सुलट चर्चा सुरू होत्या. या पतसंस्थेला टाळे लागल्याचे सभासद व ठेवीदारांच्या निदर्शनास आल्याने गोंधळ निर्माण झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही संस्था व संस्थेचा व्यवहार ठप्प झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी उपनिबंधकांकडे धाव घेत ठेवी परत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे.

शहर पोलीसात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, की शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी करून सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. सदर पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांच्या ठेवी, बचत, रीकरिंग, भागभांडवल अशा स्वरूपात असून संचालक मंडळाने विशेषता पतसंस्थेचे चेअरमन शरद गौरीहर मुंढेकर यांनी संस्थेस टाळा लावला आहे. यास्तव आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चेअरमन किंवा कोणीही संचालक भेटत नाहीत. अर्थात पतसंस्था बुडाली की काय? असा संशय आम्हास आहे. आपण आपल्या अधिकारांमध्ये संस्थेची चौकशी करावी व प्रशासक नेमून आम्हा ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उदय हिंगमिरे, शाहिबाज आगा, गौतम करपे, दत्ता तारळेकर, दिलीप पाटील यांच्यासह महिला ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.