बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला : अजित पवार

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे निधन

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष व पुस्तकांच्या गावचं एक सक्षम नेतृत्व म्हणून परिचित असणारे प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे (दादा) यांचे आज (वय-72) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

बाळासाहेब भिलारे हे गेले दीड ते दोन महिन्यापासून अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे वाटत असल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले होते, परंतु आज त्यांची प्राणज्योत माळवली. महाबळेश्वरच्या राजकारणातला एक दृष्टा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. सदैव जनतेच्या तनामानात असलेला, जनतेच्या हितासाठी कायम झटणारा, जनतेची आस्मिता जागवणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे (दादा) यांच आज निधन झाल्याची बातमी महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि अनेकांना शोक अनावर झाला, जिल्ह्याच्या राजकारणात बाळासाहेब भिलारे यांचे मोलाचे योगदान असल्याने जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी दादांना आदरांजली वाहिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांनी दादांना श्रध्दाजंली वाहिली. अजित पवार यांनी श्रध्दाजंली वाहताना म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे.त्यांच्या निधनामुळे राजकीय,सामाजिक चळवळीची,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!

You might also like