विरार : हॅलो महाराष्ट्र – विरारमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या विभागप्रमुखाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. आरोपी तरुण हा फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करत होता. त्याच्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर या महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण ?
विरार पूर्वेकडील साईनाथनगर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख जितू खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर संबंधित महिला ही विरारलाच राहते. आरोपी जितू हा तिला फोन करुन, आयटम आहे का? अशी विचारणा करुन त्रास देत होता. यानंतर या महिलेने आरोपी जितू खाडे याला रिक्षामध्ये बसलेला असताना चपलेने बेदम मारहाण केली. यानंतर महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच जितू खाडे हा फरार झाला आहे.
जितू खाडे च्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असल्याचे शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे शिवसेना विभागप्रमुखाचे नाव समोर आल्याने आता पक्षाकडून जितू खाडेवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.