पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Crime News Gava Patan Taluka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सध्या गवे वन विभागाच्या क्षेत्रात फिरताना शेतकऱ्यांना आढळून येत आहेत. दरम्यान आज पाटण तालुक्यातील रिसवड गावात गव्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून हिराबाई गोपीनाथ पवार (वय 42) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिसवड (ता. पाटण) येथे तीन दिवसापूर्वी शेतात काम करत असलेल्या महिलेवर गव्याने हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये हिराबाई पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला.

पाटण तालुक्यात गव्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर हल्ले केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून या गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.