औरंगाबाद | गुरुवारी दुपारी रांजणगाव च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकची धडक झाल्यामुळे दुचाकीला धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी आहे.
वाळूज महानगर येथील रहिवासी असलेले संगीता चांगदेव त्रिभुवन असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती चांगदेव त्रिभुवन जखमी झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार चांगदेव त्रिभुवन हे पत्नी संगीता सोबत दुचाकी वर बँकेत चालले होते. पंढरपूर येथून रांजणगाव रोडने जात असताना गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास ट्रक ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी च्या पाठीमागे बसलेल्या संगीता या हायवाच्या खाली सापडून गंभीर जखमी झाल्या तर चांगदेव हे दुचाकीवरून दूर फेकल्या गेले. यानंतर काही नागरिकांनी आणि वाहन चालकांनी या पती-पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान संगीता त्रिभुवन यांचा मृत्यू झाला.
संगीता त्रिभुवन या गृहिणी होत्या. वाळूज महानगरात पती, मुले मनोज आणि संकेत यांच्यासोबत त्या राहत होत्या. या कुटुंबाची आर्थिक स्थिती स्थिर नसल्यामुळे ते घरी लॉन्ड्री चा व्यवसाय करत होते. दोघे पती पत्नी वाळूज एमआयडीसीतील बंधन बँकेत कर्ज प्रकरण मंजूर झाल्यामुळे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरून बँकेत चालले होते. परंतु त्यापूर्वी हा घात घडला. या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून पळून गेला या ठिकाणी अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्दन साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.