महिलेची छेड काढणाऱ्या टग्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे 
सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात मोपेडवरून मैत्रिणींसह निघालेल्या महिलेची छेड काढल्यानंतर त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वडर, इरफान मुल्ला, आकाश शिंदे आणि एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत . या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
पीडित महिला तिच्या मैत्रिणींसह कॉलेज कॉर्नर परिसरातून मोपेडवरून घरी निघाली होती. त्यावेळी एका वळणावर चौघे संशयित थांबलेले होते. त्यांनी महिलेला पाहून टोमणे मारण्यास सुरवात केली. त्यानंतर त्या महिलेने गाडी थांबवून त्या चौघांना त्याचा जाब विचारला. त्यावेळी संशयितांनी त्या दोघींच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोन करून महिलेने पतीला बोलावून घेतले. पतीने घटनास्थळी येत चौघांना जाब विचारला असता चौघांनीही त्यांना मारहाण करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली, फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment