महिलेचा युवकास गंडा : नोकरीचे अमिष देवून दीड लाख उकळले, जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट पत्रही दिले

0
48
crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील एका युवकास पुण्यातील महिलेने मंत्रालयत नोकरीस असल्याचे सांगत दीड लाख रूपयांचा गंडा घातला आहे. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट नियुक्तिपत्रही महिलेने युवकास दिले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनिता देवानंद भिसे (रा. पुणे) हिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरंबे येथे आकाश भीमराव हुंबे राहण्यास आहेत. आकाश वाढेफाटा येथे सुरू असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पात साईट सुपरवायझर म्हणून कामास आहेत. याठिकाणी अनिता देवानंद भिसे या फ्लॅट खरेदीसाठी आल्या होत्या. वारंवार येत असल्याने भिसे आणि हुंबे यांची ओळख झाली. ओळखीनंतर भिसेंनी मी मंत्रालयात नोकरीस असून, तुला शासकीय नोकरी मिळवून देते, असे सांगितले. यानुसार 2018 पासून हुंबेने भिसे हिला दीड लाख रुपये दिले. यानंतरच्या काळात भिसे हिने हुंबे यांना हवेली तहसील कार्यालयात नेमणूक झाल्याचे पत्र दिले. या पत्रात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्यासाठीची तारीख नमूद करण्यात आली होती.

त्यानुसार हुंबे हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. याठिकाणी जाण्यापूर्वी त्यांनी भिसेला फोन केला. फोन केल्यानंतर भिसे त्याला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भेटली. हुंबेंकडील नियक्तीपत्र काढून घेत साहेबांना भेटून येते, असे सांगत भिसे तेथून निघून गेली. थोड्या वेळानंतर भिसे पुन्हा त्याठिकाणी आली व तिने शिपाईपदासाठी नियुक्ती झाली असून, त्याचा नेमणूक कालावधी सुरू होण्यास अवधी असल्याचे पुणे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र हुबेंना दिले. यानुसार पुन्हा हुंबे हजर होण्यासाठी गेले असता, साहेब बाहेर आहेत असे सांगत भिसेने वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवापुस्तिका व इतर बाबींची कागदपत्रे देत तशी तपासणी पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या डॉ. भारत शहा यांच्याकडून करून घेतली. भिसे वारंवार टाळाटाळ करू लागल्याने हुंबे यांना संशय आला.

यानंतर त्यांनी विविध ठिकाणी चौकशी केली असता आपल्याला दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हुंबे यांनी भिसेकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी आकाश हुंबे यांनी शुक्रवारी शाहपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. यानुसार अनिता भिसे हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here