हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. सोलापूर शहर आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात ही महिला पोलिस कर्मचारी कार्यरत होती.
याच पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिला आणि त्यामुळेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने केला आहे.
सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी हा मानसिक त्रास दिल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. संबंधित प्रकरणामध्ये पोलीसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद झालेली नाहीये. बुधवारी दुपारपर्यंत ही महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होती. त्यानंतर सोलापूर शहरपासून जवळ असलेल्या हगलूर या गावाजवळ महिलेने विष प्राशन केलं. आपण आपली जीवनयात्रा आता संपवत आहोत. अशी माहिती मृत महिलेने स्वतःच्या बहिणीला दिली. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकाने बेशुद्धावस्थेत संबंधित महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान “मृत महिला पोलिस कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्या दोघांमध्ये काही चॅटिंग झालं होतं. याच चॅटिंगवरुन महिलेच्या घरात वाद निर्माण झाले होते.मात्र हे चॅटिंग नेमकं काय होतं, महिलेने आत्महत्या कशामुळे केली हे प्राथमिक तपासात पुढे आलेलं नाहीये.महिलेचे नातेवाईक सध्या दु:खात असल्याने अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाहीये. मात्र या घटनेचा सविस्तर तपास करुन जर कोणी दोषी असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल” अशी प्रतिक्रिया पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.