औरंगाबाद – गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते, हे लक्षात घेऊन महिला सरपंचांनी कार्यपद्धती समजून घेत नियमावलीचा अभ्यास करुन गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तापडिया नाट्य मंदीर येथे आयोजित जिल्ह्यातील महिला सरपंच परिषदेत केले.
यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. गाव पातळीवरील महिला ही राजकारणाच्या माध्यमातून गावाच्या विकासात हातभार लावत आहे. हे काम करतांना बऱ्याच अडचणींचाही सामना करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक महिला सरपंचांनी शासन कार्यपद्धतीचे वाचन, अभ्यास करावा, स्वत:चे संवाद कौशल्य वाढवावे. आपण कुठल्याही दबावाला न झुकता व विरोधाला न जुमानता संयमाने प्रतिकुल परिस्थितीला अनुकुल बनवू शकतो. ज्या माध्यमातून आपण आपल्या गावाला आरोग्य, शिक्षण, पाणी, महिला सक्षमीकरण व इतर माध्यमातून समृद्ध बनवू शकतो. जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायत सरपंच भास्कर पेरे यांनी देखील उत्कृष्ट कार्य करित गावाला समृद्धी मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या गावाला विविध दृष्टीने समृद्ध करावे. त्यासाठी विविध योजना आपल्या गावात राबवण्यासाठी निधी मागणी करताना त्यांचा वेळोवेळी अभ्यासपूर्ण विकास आराखडा बैठकीत मांडत रहावा. त्याचबरोबर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनीही प्रत्येक आठवड्यातील एक दिवस महिला सरपंचाच्या बैठका घेऊन त्यांच्या मागणी बाबत विचार व कार्यवाही करण्याचे निर्देश श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
यावेळी ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिनाताई शेळके, परिषदेचे संयोजक आ. अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, यांच्यासह जिल्हापरिषदेचे विविध समित्यांचे सभापती, लोकप्रतिनिधी, महिला सरपंच उपस्थित होत्या.