VIL साठी फंड रेझिंग प्लॅन वर काम सुरू; 3375 कोटी रुपये गुंतवण्याची व्होडाफोनची तयारी

नवी दिल्ली । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) या टेलिकॉम कंपनीला कर्जातून बाहेर काढण्यासाठी कंपनीचे प्रमोटर्स सतत प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता व्होडाफोन कंपनीचे प्रमोटर्स यामध्ये 3,375 कोटी रुपये गुंतवण्याचा विचार करत आहेत.

शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन व्यतिरिक्त, पार्टनर आदित्य बिर्ला ग्रुप देखील कर्जाने बुडलेल्या VIL मध्ये 1,125 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. टेलिकॉम कंपनी 14,500 कोटी रुपयांचा फायनान्स उभारण्याच्या प्रस्तावावर भागधारकांची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय कंपनीचे अधिकृत भागभांडवल 75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही असाधारण सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.

फंड रेझिंग प्लॅन
VIL च्या बोर्डाने फायनान्स उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला यांच्याकडून 4,500 कोटी रुपये उभे करण्याव्यतिरिक्त, इक्विटी किंवा कर्जाच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभे करण्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात, व्होडाफोन ग्रुपने ब्लॉक डीलद्वारे इंडस टॉवर्समधील 2.4% हिस्सा विकून सुमारे 1,442 कोटी रुपये उभे केले. भारती एअरटेलने व्होडाफोन ग्रुपकडून इंडस टॉवर्समधील अतिरिक्त 4.7% स्टेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी या अटीवर करारावर स्वाक्षरी केली आहे की, व्होडाफोन ही रक्कम व्होडाफोन आयडिया (VI) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि नंतर इंडस टॉवर्सला पैसे देण्यासाठी वापरेल.

14,500 कोटी रुपयांचा फंड रेझिंग प्लॅन मंजूर
व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने गुरुवारी 14,500 कोटी रुपयांच्या फंड रेझिंग प्लॅनला मंजुरी दिली. इक्विटी आणि डेट इंस्ट्रुमेंट्सद्वारे 10,000 कोटी उभारले जातील. तर कंपनी आपल्या प्रमोटर्सना युरो पॅसिफिक सिक्युरिटीज लिमिटेड, प्राइम मेटल्स लिमिटेड आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स यांना 20% प्रीमियमवर 13.30 रुपये दराने 3.39 अब्ज शेअर जारी करेल. यातून 4500 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

कर्जाच्या जाळ्यात कंपनी
Vodafone Idea ने Q3FY22 मध्ये 7,230.9 कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला आहे, तर Q3FY21 मध्ये 4,532.1 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. तिमाही महसुलात 3.3% ने सुधारणा होऊन रु. 9,720 कोटी झाला आहे. महसुलात सुधारणा होण्याचे कारण म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आलेली दरवाढ आहे.