सफारी पार्कच्या लांब भिंतींचे काम पंधरा महिन्यात होईल पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मिटमिटा या ठिकाणी होत असलेल्या सफारी पार्कच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. आता या पार्कसाठी 100 एकर जागेच्या संरक्षणासाठी चार किलोमीटर लांबीची आणि 12 फूट उंचीची कंपाउंड वॉल बांधण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत अर्धा किलोमीटर एवढे काम पूर्ण झाले आहे. ही पूर्ण भिंत बांधण्यासाठी पंधरा महिने लागतील.

महापालिकेच्या सिद्धार्थ गार्डन येथे प्राण्यांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे मिटमिटा येथे प्राण्यांसाठी सफारी पार्क बांधण्याची आणि त्या ठिकाणी सर्व प्राणी स्थलांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. यापूर्वी सेंट्रल प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) प्राण्यासाठी महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात पुरेशी जागा कमी असल्याचे सांगून आक्षेप नोंदविला होता. यानंतर दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे निवृत्त संचालक बी आर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) यांची मास्टर प्लान तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. हा प्लॅन मंजूर केल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या उणीवा दूर केले असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.

सफारी पार्कसाठी अतिरिक्त 58 हेक्टर जमीनीचा प्रस्ताव तयार केला जात असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ASCDCL) स्मार्ट सिटी मिशन यांच्या वतीने या कामासाठी 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कडून सफारी पार्क जमिनीचे सपाटीकरण संरक्षण भिंतीच्या 4 हजार 250 मीटर बांधकामाला सुरुवात झाली असून या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची 12 फूट उंच भिंत बांधण्यात येणार आहे. त्यावर तारेचे कुंपण लावण्यात येईल. सध्या एक किलोमीटर फिटिंगचे काम आणि अर्धा किलोमीटरचे भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या कामासाठी 15 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

Leave a Comment