हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Earth Day 2024) आज दिनांक २२ एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिन‘ साजरा केला जात आहे. दिनांक २२ एप्रिल १९७० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला. पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस प्रतिवर्षी साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेचे महत्त्व पटवून निरोगी ग्रह व उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन कृती करण्यासाठी हा दिवस प्रोत्साहित करतो. एकंदरच काय तर हा दिवस निसर्ग संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे आणि परिवर्तनाची प्रेरणा देण्याचे काम करतो. आज आपण या खास दिवसामागील इतिहास जाणून घेणार आहोत.
या दिवसाची सुरुवात कुणी केली?
अनेक देशांनी मिळून पृथ्वीच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवण्याच्या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, २२ एप्रिल १९७० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला. निसर्ग आणि मानवामध्ये संतुलन राखण्यासाठी अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आणि हार्वर्डचे विद्यार्थी डेनिस हेस यांनी ‘जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day 2024) साजरा करण्याची सुरुवात केली. या दिवसाचे निमित्त साधून त्यांनी लोकांना एक खास संदेश दिला.
‘पृथ्वीवर जर मनुष्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर प्रत्येकाने पृथ्वीबद्दल विचार करणे गरजेचे आहे. वाढणारी लोकसंख्या, प्रदूषण, नैसर्गिक स्त्रोतांवर येणारा ताण, वातावरणातील असंतुलन यामुळे कालांतराने पृथ्वीवर राहायला किंचितही जागा राहणार नाही. (World Earth Day 2024) हा दिवस फार दूर नसेल आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे’, असे नेल्सन यांनी म्हटले.
जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास
अमेरिकेत दिवसेंदिवस वातावरण बिघडत होते आणि दुसरीकडे जानेवारी १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा येथे झालेली प्रचंड तेलगळती या घटनांनी गेलॉर्ड नेल्सन अक्षरशः त्रासले होते. व्यथित भावनेतून त्यांनी पर्यावरणाच्या दुष्परिणामांबाबत जगाला जागरूक करण्याचे ठरवले. (World Earth Day 2024) वायू आणि जल प्रदूषणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी विद्यार्थी वर्गाला टार्गेट केले. त्यांच्यामध्ये आंदोलनाची ऊर्जा ओतली. कॅम्पसच्या शिकवणीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची कल्पना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी डेनिस हेस या तरुणाची निवड केली.
यानंतर दोघांनी मिळून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी स्प्रिंग ब्रेक आणि अंतिम परीक्षेदरम्यान २२ एप्रिल हा दिवस निवडला. या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण अमेरिकेतून २ कोटी लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. ज्याचा तात्काळ परिणाम दिसून आला. (World Earth Day 2024) त्यानंतर ‘पृथ्वी दिन’ हा राष्ट्रीय सीमा ओलांडून जागतिक कार्यक्रम बनला आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हा दिवस महत्वाचा ठरला. आपण स्वत: ला निसर्गापासून वेगळे समजू शकत नाही. ही भावना रुजू लागली.
यंदाची थीम आणि त्याचा उद्देश (World Earth Day 2024)
यंदा ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा करण्याची थीम प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक अशी आहे. यामध्ये प्लॅस्टिक प्रदूषण आणि त्यामुळे निसर्गाचे होणारे नुकसान या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा उद्देश आहे. पृथ्वी दिन २०२४ हा ग्रहांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक संपविण्याचे उद्दीष्ट ठेवून साजरा केला जात आहे. यामध्ये २०२४ पासून पुढे २०४० पर्यंत सर्व प्लास्टिकच्या उत्पादनात ६०% कपात करण्याची मागणी करण्यात आली आहे. (World Earth Day 2024) हा दिवस ग्रहाच्या रक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासह पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरणा देत आहे.