चंदेरी दुनिया । माय नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड!’ सर इयान फ्लेमिंग यांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे करिश्माई वाक्य आपल्या अनोख्या शैलीत उच्चारणारा जेम्स बॉण्ड गेली ६० वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून जेम्स बॉण्ड ओळखला जातो. याच बॉण्डची आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेही दखल घेतली आहे. बॉण्डपटातील एका दृश्याला चित्रपट इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा स्टंट म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा पुरस्कार मिळाला आहे.
हा स्टंट २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्पेक्टर’ या चित्रपटातील आहे. २८ जून २०१५ साली मोरक्कोमध्ये हे दृश्य चित्रीत केले गेले होते. या सात मिनीटांच्या दृश्यात जेम्स बॉण्ड प्रचंड मोठा विस्फोट करतो. हा स्टंट चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शक सॅम मेंडेस यांनी तब्बल ८ हजार ४१८ लीटर इंधन व ३३ किलो विस्फोटके वापरली होती. या दृश्यात झालेल्या विस्फोटात शेकडो मीटर उंच आगीच्या ज्वाला पसरल्या होत्या. याच दृश्यामुळे जेम्स बॉण्डला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा पुरस्कार मिळाला आहे.
तब्बल ८८. ०७ कोटी अमेरिकी डॉलरची कमाई करणारा ‘स्पेक्टर’ हा आजवरचा सर्वात यशस्वी बॉण्डपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सॅम मेंडेस यांनी केले होते. या चित्रपटात अभिनेता डॅनियल क्रेग याने बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती. हा डॅनियलच्या सिनेकारकिर्दीतील चौथा बॉण्डपट होता.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा –https://www.youtube.com/watch?v=YAg_jqthRY4




