औरंगाबाद | मराठवाड्यातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. पण हा अंदाज मिळत नसल्याने मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी आणि पावसामुळे शेतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे मराठवाड्यातील हवामानाचे संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी, हवामानअभ्यासक आणि उद्योजकांकडून होत आहे.
‘हवामानाचा अचूक अंदाज, माहिती पोहोचत नसल्यामुळे शेतकरी दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या कचाट्यात अडकला आहे. मराठवाड्यामध्ये दोन वर्षांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटी होत असल्यामुळे सुमारे ७० लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. त्याचबरोबर लहरी हवामानाचा परिणाम येथील औद्योगिक विकासावरही होत होत आहे’ असे शेतकरी, उद्योजकांनी सांगितलं आहे. त्यातूनच मराठवाड्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉफिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम)ने स्वतंत्र रडार बसवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आयआयटीएमचे युनिट येण्यासाठी उशीर होत असल्यामुळे एक्स-बॅण्ड रडार तरी या विभागासाठी शासनाने बसविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाऊल उचलले गेले तर येथील शेती, माणसे, जनावरे अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या तडाख्यातून वाचण्यास मदत होणे शक्य होईल.
आयएमडीची मुंबई, नागपूर, पुणे येथे (आरएमसी) प्रादेशिक हवामान केंद्रे आहेत. परंतु मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात अद्याप काहीही निर्णय होत नसल्यामुळे हा विभाग शेतीसह सगळ्या बाबीत मागे आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, जालन्यातील अनेक तालुक्यांत ढगफुटी होऊन पिके वाया गेली आहेत. मराठवाड्यातील 42 पेक्षा अधिक तालुक्यांत ढगफुटीने खरीप हंगाम वाया जात असल्याचे प्रमाण मागील दोन वर्षांत दिसून येत आहे. आयआयटीएम चार रडार आणत आहे. त्यातील एक रडार तरी औरंगाबादला बसविण्यात यावे, अशी मागणी हवामान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केली आहे. संशोधन आणि विश्लेषण युनिट स्थापन होईपर्यंत 40 कोटींचे एक्स-बॅण्ड रडार औरंगाबादला बसविले जावे, अशी त्यांची मागणी आहे. गेल्या वर्षात सिल्लोड येथील अजिंठा लेणी परिसरात रडार बसविण्यासाठी मागणी पुढे आली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागा देण्याची तयारी देखील केली होती. आजवर एक्स-बॅण्ड रडार बसविले असते, तर मराठवाड्याच्या ढगफुटीची माहिती त्या रडारवरून मिळाली असती.
‘कोरोना संसर्गापूर्वी औरंगाबादमध्ये आयआयटीएमचे एक युनिट यावे किंवा रडार बसवावे, यासाठी मागणीच्या अनुषंगाने बैठक घेतली होती. शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग त्या बैठकीत होते. त्याचबरोबर एक पथक पाहणीसाठी औरंगाबादेत येणार होते. परंतु कोरोनामुळे पुढे काही बोलणे झाले नाही. याबाबत नव्याने मागणी करण्यात येईल. असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.