हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yamraj Temple) संपूर्ण भारतात अशी अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास फार प्रभावी आहे. जगात एकही माणूस असा नाही जो मृत्यूला घाबरत नाही. मरण येणार.. या नुसत्या कल्पनेने हात पाय गाळणारी बरीच लोक आहेत. आपण सारेच जाणतो की, मृत्यूनंतर आत्मा एकतर स्वर्गात जातो नाहीतर नरकात जातो. पण याचा न्यायनिवाडा मृत्युदेवता यमराज करतात. यमराजाच्या नावानेच लोक चळाचळा कापतात. अशा मृत्युदेवतेचे भारतात एक अनोखे आणि अद्भुत मंदिर आहे. जिथे मृत्यूनंतर सर्वात आधी आत्मा हजेरी लावतो आणि मगच त्याचा न्याय होतो.
कुठे आहे मृत्यु देवतेचे मंदिर? (Yamraj Temple)
भारतात अनेक मंदिरे आहेत. ज्यामध्ये एक मंदिर मृत्युदेवता यमराजाचे आहे. इथे मृत्यूनंतर आत्मा येतो आणि त्यानंतर न्यायदेवता यमराज त्या आत्म्यासाठी एकतर स्वर्ग नाहीतर नरकाचे द्वार उघडतात. मानवाच्या मृत्यूनंतर या मंदिरात भरतो यमराजाच्या दरबार आणि मग होतो आत्म्याचा न्याय निवाडा. असे हे अद्भुत आणि रहस्यमय मंदिर हिमाचलमधील चंबा जिल्ह्यात भरमौर येथे आहे. यमराजाचे हे एकमेव मंदिर आहे. जे भारतात आहे. मुख्य म्हणजे, या मंदिरात लोक दर्शनासाठी जायलासुद्धा घाबरतात.
काय सांगते आख्यायिका?
या मंदिराची आख्यायिका सांगते की, मृत्यूनंतर आत्मा सर्वात आधी या मंदिरात येतो. त्यानंतर या मंदिरात मृत्युदेवता यमराजाचा दरबार भरतो. मग तो आत्मा स्वर्ग सुख भोगणार की नर्क यातना याचा निर्णय होतो. हे मंदिर अगदी लहान आणि घरासारखं दिसतं. जे उंच पर्वतांच्या मधोमध वसलेलं असून त्याची ओळख धर्मराज अशी आहे. (Yamraj Temple) हे मंदिर कोणी आणि कधी बांधले? याबद्दल काहीही माहिती नाही. पण इतिहासात असा उल्लेख सापडतो की, सहाव्या शतकात चंबाच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केलं होतं. या मंदिराला तांबे, लोखंड, सोनं आणि चांदीचे चार दरवाजे आहेत. जे खरोखरच या मंदिराला आकर्षक बनवतात. असे असले तरीही या मंदिराच्या आत जाण्याची कुणाची हिंमत होत नाही.
चित्रगुप्ताची खोली
यमराजाच्या या एकमेव मंदिरात जेव्हा एखादा आत्मा हजेरी लावतो, तेव्हा सर्वात आधी भगवान चित्रगुप्त त्याच्या कर्माचे तपशील पाहतो. या मंदिरात एक खोली आहे जी चित्रगुप्ताची खोली असल्याचे म्हटले जाते. याच खोलीत बसून चित्रगुप्त माणसाच्या कर्माचा लेखजोखा करतात, असे म्हणतात. (Yamraj Temple) जेव्हा चित्रगुप्त आत्म्याच्या कर्माचे तपशील पाहतात यानंतर तो आत्मा स्वर्गसुख घेणार की नर्क यातना भोगणार हे ठरवले जाते. न्याय झाल्यानंतर यमराज त्या आत्माला ओढत घेऊन जातात, असे म्हटले जाते. कदाचित म्हणून या मंदिरात जाण्यापासून लोक घाबरतात. बरीच लोक या मंदिराच्या बाहेरूनच हात जोडतात. तर काही लोक आसपास देखील भटकत नाहीत.