हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भात भाजपचा पुरता सुपडा साफ झाला… अनेक दिग्गज घरी बसले… पण भाजपच्या सर्वात जास्त जिव्हारी लागलेला निकाल होता तो अमरावतीचा… हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि लाईम लाईट मध्ये आलेल्या राणांना भाजपकडून तिकीट मिळालं… मोदींपासून ते महायुतीच्या अजितदादा, शिंदे यांनी फिल्डिंग लावूनही काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी जोरदार मुसंडी मारत राणांचा करेक्ट कार्यक्रम केला…
पण कुणीबी समोर येऊंद्या गुलाल आपलाच असणारय, असा कॉन्फिडन्स प्रत्यक्ष मतदानापासून ते निकालापर्यंत कायम ठेवणाऱ्या नवनीत राणांचा (Navneet Rana) तोंडावर पडण्याचा कार्यक्रम झालाच… बळवंत वानखेडे हे अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार असले तरी त्यांना या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या दोन माणसांनी अमरावतीच्या राजकारणात बरीच उलथापालथ घडवून आणली… आणि राणा दांपत्याच्या हवेत गिरक्या घेणाऱ्या राजकारणाला जमिनीवर आणलं… ती दोन नावं आहेत यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांची… भाजपच्या स्टार खासदार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी कसं जंग जंग पछाडलं होतं? ठाकूर आणि कडू या जोडगोळीने मिळून राणा दांपत्याच्या राजकारणाचे कसे पंख छाटलेत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
संपूर्ण महाराष्ट्रात राणांची क्रेझ असली तरी अमरावतीतील स्थानिक नेत्यांना राणा दाम्पत्य नेहमी शिंगावर घेत गेले… यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांना तर नवनीत राणा आणि रवी राणा हे अनेक डेंजर स्टेटमेंट करून निकालात काढत होते… याचाच वचपा या ठाकूर आणि कडू जोडगोळीने काढला… अमरावतीच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद तसा नवा नाही. निवडणुकीनंतर नवनीत राणा या भाजपमध्ये जातील, असा संशय यशोमती ठाकूर यांना सुरुवातीपासून होता. त्यामुळे प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्याकडून आघाडीशी प्रामाणिक राहील, अशी शपथ घेण्यास यशोमती ठाकूर यांनी भाग पाडले होते…पण निकालानंतर राणा यांनी पलटी मारली आणि त्या हिंदुत्वाची लाईन पकडत भाजपच्या जवळ गेल्या… तर दुसऱ्या बाजूला रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाई हे दोन नेते अनेकदा आमनेसामने आले…
पण भाजपने भली मोठी ताकद आणि प्रचार यंत्रणा पाठीशी लावूनही नवनीत राणा यांच्या राजकारणाचं विमान जमिनीवर आदळलं त्याला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे यशोमती ठाकूर यांनी जमवून आणलेलं बेरजेचं राजकारण…. 2019 ला ज्या नवनीत राणा यांच्यासाठी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी फिल्डिंग लावली होती…त्याच राणांनी दिलेला शब्द मोडल्यामुळे यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे यांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा लावली होती…दलित, मुस्लिम मतं काँग्रेसच्या बाजूने कशी वळतील यासाठी ठाकूरांनी प्रचाराचा धुराळा उडवून लावला होता… राणा दांपत्याच्या एककल्ली राजकारणामुळे दुखावलेल्या स्थानिक नेत्यांची मोट बांधून त्यांना राणांच्या विरोधात पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह करण्यात मोठा वाटा हा यशोमती ताईंचा राहिला… स्थानिक जातीय समीकरण ध्यानात घेऊन निर्णायक ठरणाऱ्या समाजांच्या नेतृत्वाला भेटून ही सगळी मतं एकगठ्ठा बळवंत वानखेडेंच्या पाठीशी कशी राहतील? यासाठी यशोमती ठाकूर यांनी बरीच ताकद लावली… या सगळ्यात काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणायचं हे टारगेट होतंच पण त्यापेक्षा जास्त नवनीत राणांचा कार्यक्रम करायचा! ही भावना जास्त असल्याचं यशोमती ठाकूरांच्या एकूणच बोडी लँग्वेजमधून दिसत होतं…
नवनीत राणा खासदारकीला जोरात आपटल्या त्याचं दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीची वज्रमूठ … तसं पाहायला गेलं तर अमरावतीच्या बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचाराची सगळी धुरा यशोमती ठाकूर यांच्या खांद्यावर होती… त्यासाठी त्यांनी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या सगळ्यांना नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावतीतून प्रचारात उतरवलं आणि मोठा जनाधार उभा केला… नवनीत राणा यांची तयार झालेली हार्डकोर हिंदुत्वाची इमेज डॅमेज करण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी प्रचारात फुल प्लॅनिंगही केलं होतं…त्यात संविधान बदलवण्याचं नरेटीव, अल्पसंख्याकांना असणारा धोका आणि महागाई – बेरोजगारीचा मुद्दा ही आपल्या प्रचाराची लाईन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढे घेऊन जाण्यात यशोमती ठाकूर यांना यश आल्यानं राणा इथून मोठ्या लीडने पराभूत झाल्या…
आता येऊयात बच्चू कडू यांच्याकडे…
बच्चू कडू (Bachhu Kadu) हे अमरावतीची लोकसभा आर या पार या न्यायाने लढले.. ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते दिनेश बुब यांना प्रहारमध्ये घेत बच्चू कडूंनी अमरावती लोकसभा पिंजून काढला… यावेळेस त्यांच्या रडारवर केवळ एकच विरोधक होता तो म्हणजे नवनीत राणा…रवी राणा आणि नवनीत राणा यांनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्यावर केलेल्या आरोपांचे उट्टे काढत बच्चू कडू यांनी वातावरण तापवून दिलं… मतदारसंघातील अनेक हिंदुत्ववादी मतं बच्चू कडूंनी आपल्या पारड्यात पाडून घेत नवनीत राणा यांच्या पायाखालची वाळू सरकवली… बच्चू कडूंचा प्रचारही हटके राहिला… त्यांनी सभांचा एका मागून एक सपाटा लावलाच पण त्यासोबत सोशल मीडिया ऍक्टिव्ह ठेवून नवनीत राणा यांना जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल? यासाठी मोर्चे बांधणी केली… निकालात राणा जिंकू नयेत म्हणून त्यांनी आपल्या संघटनेची मतं शेवटच्या काही क्षणात काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची खेळीही बच्चू कडूंनी खेळण्याचीही मतदारसंघात बरीच चर्चा सुरू आहे…
एकूणच मतांची आकडेवारी बघितली तर दिनेश बुब यांनी खाल्लेल्या मतांमुळेच आज नवनीत राणा या खासदार नाहीयेत, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… थोडक्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्थानिक समीकरण लाईटली घेऊन आपण भाजपच्या फोर्सवर आरामात निवडून येऊ, असा गैरसमज करून घेतला होता… याच गैरसमजला अमरावतीतून यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी सुरुंग लावलाय…त्यामुळे लोकसभेला झालेल्या या पराभवामुळे आता राणा दांपत्याच्या राजकारणाचा सूर्य अमरावतीच्या राजकारणातून मावळला आहे का? नवनीत राणा यांची हवा असतानाही निकालात त्यांचा फुसका बार नेमका का निघाला? या सगळ्या पाठीमागे खरंच यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांचे मजबूत हात होते का? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,