हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला उद्या शुक्रवारपासून दिमाखात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाची जय्यत तयारी झाली आहे. उद्या (शुक्रवारी) प्रदर्शनाचे औपचारिक आणि शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली होती. यंदाचे १८ वे प्रदर्शन देखील दिमाखात होणार आहे. दरवर्षी अंदाजे १० लाखांहून अधिक लोक या प्रदर्शनाला हजेरी लावतात. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनात पाहायला मिळते.
https://fb.watch/ovmvyqhYEy/?mibextid=Nif5oz
प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह मान्यवर प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार असल्याने प्रांताधिकारी, तहसीलदार, वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी प्रदर्शनस्थळाची पाहणी केली. तसेच व्यवस्था आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटची टीम उपस्थित होती.