टीम हॅलो महाराष्ट्र | महाराष्ट्र व कर्नाटकाला कोणता भाग देण्यात येणार आहे हे महाजन आयोगानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारचे विवाद तयार करणे योग्य नाही, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कर्नाटक व महाराष्ट्र सीमावादावर भाष्य केले. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद चांगलाच पेटला आहे. कालच कर्नाटक नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला. या घटनेवर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाची कोल्हापूर वरून कर्नाटकात जाणारी बस बंद ठेवण्यात आली.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद हा बेळगाव शहरावरून अधिक आहे. बेळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनता राहते. तसेच तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेवर सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व राहिले आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यावर हा प्रश्न सोडवण्यासाठी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.