पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मधील परिचित चेहरा असलेल्या करण मेहरा या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. करणची बायको निशा रावल हिने त्याच्याविरोधात गंभीर आरोप करीत तक्रार दाखल केली होती. निशा ही देखील अभिनेत्री असून तिनेदेखील काही हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. निशा आणि करण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सातत्याने खटके उडत होते. त्यांच्या वैवाहीक आयुष्यातील अडीअडचणींबाबत हिंदी मालिकासृष्टीत बरीच चर्चा सुरू होती. निशाने पती करण याने आपल्याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तिने गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून करणला अटक झाली आहे.

 

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार एएनआयने सादर केलेल्या वृत्तप्रमाणे, निशाने सोमवारी ३१ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. निशाने करणवर मारहाण व प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. करण आणि निशा यांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये विविध मुद्द्यांवरून विकोपाचे वाद सुरू असल्याचे वृत्त वारंवार समोर येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निशाने करणशी कोणताही वाद नसल्याचे सांगत या सर्व बातम्या अफवा आहेत असे म्हटले होते.

 

दरम्यान, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय हिंदी टीव्ही मालिकेत अभिनेता करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेतील त्याने निभावलेली नैतिकची भूमिका प्रेक्षकांना अत्यंत भावली होती. या मालिकेत करणबरोबर हिना खान मुख्य भूमिकेत होती. शिवाय करण ‘बिग बॉस १०’ आणि ‘नच बलिये ५’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला दिसला आहे. निशा रावलबद्दल सांगायचे झाले, तर ती सध्या शादी मुबारक या मालिकेत दिसत आहे. करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा लहान मुलगा आहे. ज्याचे नाव कविश आहे. सध्या या दोघांमधील वादाचे स्वरूप पाहता कवीशच्या बालमनावर काय आघात होत असतील याचा विचार करणेही अवघड आहे. तूर्तास तरी करणला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.