परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण असणाऱ्या आणि येत्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असणाऱ्या येलदरी धरणामध्ये परतीच्या पावसाने मुबलक पाणीसाठा झाला असून आता या पाणीसाठ्याचा वापर करत वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून चालू असलेल्या पाणी विसर्गामुळे पूर्णा नदी वरील परभणी जिल्ह्यात असणारे येलदरी धरण आता जवळपास नव्वद टक्के भरत आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये धरणाच्या दहा हि दरवाजांमधून केव्हाही विसर्ग पुर्णा नदीपात्रामध्ये होऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे.
तत्पूर्वी पूर नियंत्रित रहावा म्हणून धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रांमधून वीज निर्मिती सुरु करण्यात आली आहे. यातून सध्या 15 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. येलदरी धरण वीज निर्मिती केंद्राची 22.5 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती क्षमता आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते दहा च्या दरम्यान धरणांमध्ये 11. 167 दलघमी पाण्याची आवक झाली होती. धरणामध्ये 714.120 दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. ह्याची कालपर्यंत ची टक्केवारी 88.18 एवढी होती. दरम्यान पुढील तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी येलदरी धरणाचे दरवाजे उघडले जाऊन पूर्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा येलदरी पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.