धोनीला माफी नाही, त्याने युवराजचं करिअर संपवलं; गंभीर आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोनीला (MS Dhoni) माफी नाही, त्याने युवराजचं (Yuvraj Singh) करिअर संपवलं असं म्हणत युवराज सिंगचे वडील आणि भारतचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. युवराज मध्ये अजूनही ४-५ वर्ष क्रिकेट बाकी होते मात्र महेंद्रसिंह धोनीने कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप योगराज सिंह (Yograj Singh) यांनी केला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. झी स्विचच्या यूट्यूब चॅनलवर योगराज सिंह बोलत होते.

‘मी महेंद्रसिंह धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात बघावा, तो भलेही खूप मोठा क्रिकेटर असेल , पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे आता समोर येत आहे. धोनीला आयुष्यात कधीच माफ केलं जाऊ शकत नाही मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले असं म्हणत योगराज सिंह यांनी धोनीबद्दल आपला संताप व्यक्त केला. तसेच कर्करोगाने त्रस्त असतानाही युवराजने देशासाठी विश्वचषक जिंकला. यासाठी त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी सुद्धा योगराज सिंह यांनी केली .

दरम्यान, योगराज सिंह हे जरी धोनीबद्दल काहीही विधाने करत असले तरी युवराज आणि धोनीची दोस्ती संपूर्ण जगाला माहित आहे. दोघांनी संघ अडचणीत असतां अनेकदा मधल्या फळीत दमदार पार्टनरशिप केली आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट मध्ये युवी- माही जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. धोनीच्या नेतृत्वाखालीच 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत युवराजने सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन बनला.

युवराजच्या एकूण कारकिर्दीबाबाबत (Yuvraj Singh Career) सांगायचं झाल्यास, 2000 साली भारतासाठी पदार्पण केलेल्या युवराजने 402 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11178 धावा केल्या, यादरम्यान युवीने 17 शतके आणि 71 अर्धशतके ठोकली. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2002, ICC T20 विश्वचषक 2007 आणि ICC क्रिकेट विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघांचा तो भाग होता. युवराजने मारलेले ६ चेंडूत ६ सिक्स अजूनही क्रिकेटप्रेमी विसरले नाहीत. जून 2019 मध्ये युवीने सर्व फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.