“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? ” संजय गायकवाड

फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्हे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? अशा शब्दात गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका केली.

संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल आणि सकाळी बाईट दिला या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, मी मीडियाला कधी बाईट दिला याची त्यांना माहिती नसेल. संध्याकाळी ५ वाजता मी बोललो होतो तेव्हा सकाळ नव्हती. तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. मी जे बोललो त्यावर ठाम आहे असंही गायकवाड म्हणाले. त्याचसोबत नारायण राणे, नितेश राणे यांच्यासारखे भाजपाचे काही लोक मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात.

तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? कोरोनावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर मी माझी भूमिका मांडली. लोकांचे जीव वाचले पाहिजेत हे मला वाटतं. आम्हाला सल्ले देण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला सल्ला देऊन राज्याला मदत द्यायला सांगा. फुकटचे सल्ले द्यायची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते. ते सल्ले उद्धवसाहेब आम्हाला देतात ते आम्ही ऐकतो असा टोला संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

You might also like