इंदूर । कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या मुंबईच्या एका व्यावसायिक तरुणानं इंदूरमध्ये आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर येतेय. (Businessman Pankaj Kamble Suicide) पंकज कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. इंदोरच्या ‘ग्लोडी पॅलेस’ नावाच्या एका बड्या हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत पंकजनं आपलं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पंकजच्या नावावर चार कंपन्या याशिवाय गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव असं बरंच काही मिळवलं होत. या घटनेची इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालीय.
पंकजचा चुलत भाऊ बेनी प्रसाद याच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी पंकज कांबळे मुंबईतून इंदूरला गेला होता. या विवाहाच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी पंकजनं स्वीकारली होती. परंतु, तब्येत अचानक बिघडल्याचं सांगत पंकज विवाहसोहळ्यातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रुममध्ये पंकजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
‘आय लव्ह यू नीलम’
पंकजच्या रुममधून पोलिसांना दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली आहे. या डायरीत त्यानं ‘आय लव्ह यू नीलम’ असंही लिहिलेलं पोलिसांच्या निदर्शनास आलंय. सोबतच आपल्या बँक खात्यात एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही पंकजनं डायरीत केलाय. ‘सुसाईड नोट’च्या आधारे पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केलीय. प्राथमिकदृष्ट्या प्रेमप्रकरणातून आणि तणाव हे या आत्महत्येमागची कारणं असू शकतात, असा पोलिसांचा कयास आहे.
मृत्यूपूर्वी कुटुंबाला केले अनेक मॅसेज
पंकजनं मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबाला अनेक मॅसेज केल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. यामध्ये त्यानं आपल्या कामाच्या तणावाबद्दल काही उल्लेख केला होता. ‘कामाच्या तणावामुळे मी मृत्यूला सामोरं जातोय. यात कुणाचाही दोष नाही’ असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’