“मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय”; म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या तरुणाचे नाव योगेश नासरे असे आहे. तो अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहे. एका आमदाराच्या रुग्णवाहिकेवर आरोग्य दूत म्हणून काम करत होता. योगेशने शनिवारी दुपारी त्याच्या मित्रांना फेसबुकवर एक पोस्ट लिहिली.

या पोस्टमध्ये ‘मित्रानो माफ करा. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली. चांगले काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो’, असे सांगून त्याने आपण फुटाळा तलावावर ‘लाईव्ह’ येणार असल्याचे त्यात नमूद केले. त्याने त्याच्या आई-वडिलांना माफी मागितली. ही फेसबुक पोस्ट वाचून धोका लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी ती लगेच व्हायरल केली. नागपूर पोलिसांनी फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने फुटाळा तलावाकडे धाव घेतली. योगेश तलावात उडी घेईल, असा अंदाज होता. त्यामुळे या भागातील पोहणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी लगेच तेथे सज्ज ठेवले. दुपारी १ वाजताच्या सुमारास एक तरुण फुटाळा तलावाकडे येत असल्याचे बघून पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते पाहून योगेश बाजूच्या वस्तीकडे धावला.

त्या ठिकाणी जाऊन त्याने खिशातील विषाची बाटली काढून विष प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी रस्त्यात पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता जाणून घेतला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली. मेडिकल मध्ये पोलिसांनी आधीच सूचित केल्यामुळे डॉक्टरांचे पथक योगेशच्या उपचारासाठी सज्ज होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

You might also like