पुणे हादरलं ! उधारीचे 20 हजार मागितले म्हणून युवकाची निर्घृणपणे हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उधारीचे पैसे मागितले म्हणून एक मित्राने आपल्याच मित्राची कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करून हत्या केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी समोर हि घटना घडली आहे.

युवराज बाबुराव जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी मृत तरुणाचे वडील बाबुराव माणिक जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. तर गणेश सुरेश खरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी गणेश हा सराईत गुन्हेगार आहे. बाबुराव माणिक जाधव यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मोलमजुरीची कामे करतो. आरोपी गणेशने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. त्यानंतर मृत युवराज हा आरोपी गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता.

घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशाची मागणी केली. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजवर सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. यादरम्यान युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.