मुलीच्या छेडछाडीवरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी आरोपीने एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृणपणे खून केला आहे. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजे असे 23 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील तलाव कट्टा भागातील मृत शुभम राजे व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून मोठा वाद झाला होता.

याच रागातून आरोपी 19 एप्रिलच्या पहाटे आपल्या काही साथीदारांसोबत तलाबकट्टा परिसरात आला. यानंतर त्यांनी मृत शुभम राजे याच्यावर गुप्ती, खंजीराने गळ्यावर सपासप वार करून त्याची हत्या केली. हिंगोली शहरातील तालाब कट्टा परिसरात रात्रीच्या सु्मारात ही घटना घडली. यावेळी आरोपींनी शुभमला घरातून बोलावून घेत त्याच्याबरोबर पुन्हा वाद करून त्याच्या शरीरावर गुप्ती, खंजीर लोखंडी पाइपने सपासप वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शुभमला त्या ठिकाणाहून पळता आले नाही तो जागीच कोसळला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थवरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मृत शुभम राजे याची आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.