Tuesday, June 6, 2023

मुंबईत राणेंच्या निवासस्थानाबाहेर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून युवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुंबई येथील मंत्री नारायण राणेंच्या निवास स्थानाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्तेही त्या ठिकाणी आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

मंत्री राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यामुळे याचे पडसाद महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात नारायण राणेच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. मुंबईतही शिवसेना नेते वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेते तथा मंत्री राणेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येने युवासैनिकांनी एकत्रित येत आंदोलनास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्तेही त्या ठिकाणी आले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला.

 

कोणत्याही स्वरूपात युवासेनेचे कार्यकर्ते मुंबईतील जुहू येथील मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याच्या परिसरात हल्ला करू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी राणेंच्या बंगल्या भोवताली कडक सुरक्षाव्यवस्था तेनात केली आहे.