हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक शतकापासून ते आजपर्यंत अलंकारांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. तेव्हा पासून दिवसेंदिवस सोन्यात गुंतवणूक करण्याचा महिलांचा कल वाढत आहे. काही महिला सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे एक पारंपरिक प्रथा समजतात तर दुसऱ्या बाजूला ती गुंतवणूक पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग असते. आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील तरुण महिलांमध्ये सोनं खरेदी करण्याचा नवा ट्रेंड दिसत आहे. या छोट्या गुंतवणुकीतून मोठी बचत होऊ शकते ज्यामुळे आर्थिक स्थिरता प्राप्त होते. या कारणामुळेच सोन्याच्या धातूकडे आकर्षण वाढत आहे.
आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल
महिला आता स्वत:च्या आर्थिक भविष्याचा विचार करत अधिक सजग होत आहेत. त्यांची निर्णयक्षमता वाढली असून त्यांना आता आपल्या आर्थिक खर्चावर अधिक नियंत्रण ठेवायचे आहे. महिलांच्या कामाच्या मानसिकतेत झालेले बदल, वेतनातील असमानता कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि आर्थिक स्थिरतेवर दिलेले अधिक लक्ष यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, जे पारंपारिक पद्धतींमध्ये प्रामुख्याने पुरुषांकरताच राखीव होते. ते आता 21 व्या शतकात बदलताना दिसत आहे.
सोने गुंतवणुकीचे सर्वोच्च साधन
आजही महिलांचे सोन्याबद्दलचे आकर्षण कायम आहे. भलेही त्या इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्या, तरी सोन्याचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विशेष स्थान आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला संपत्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे महिलांसाठी हे गुंतवणुकीचे सर्वोच्च साधन ठरते. भौतिक सोने खरेदीसोबतच आजच्या काळात डिजिटल सोने आणि सुवर्ण रोखे यांसारख्या पर्यायांचा स्वीकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महिलांचे हे नव्या गुंतवणुकीच्या साधनांकडे वळणे हा बदल अधिक सुरक्षिततेची आणि सोयीची जाणीव करून देत आहे. त्यामुळे नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवण्याचा चांगला मार्ग आहे.
तरुण महिलांचा गुंतवणूक दृष्टिकोन
तरुण महिलांचे सोने खरेदी करण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपारिक पिढ्यांच्या तुलनेत वेगळा आहे. दागिने खरेदी करून त्यांचा उपयोग गुंतवणुकीसाठी करण्यापेक्षा त्या आता संपत्ती वाढवण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी सोन्याला एक साधन मानत आहेत. सोन्याच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक विविध आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे.