धक्कादायक ! दुकानात गेलेल्या तरुणीची सामूहिक बलात्कार करून हत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. दुकानात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्यानंतर शिरपूर याठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी मृत्यूचे गूढ उलगडले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची माहिती देणारा तरुणच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींनी तरुणीची हत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत गैरप्रकार केल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात राहणारी 18 वर्षीय तरुणी दुकानात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. यानंतर सायंकाळ झाली तरी हि तरुणी घरी आली नव्हती. यामुळे या तरुणीच्या कुटुंबीयांनी सगळीकडे तिची शोधाशोध सुरु केली. त्यांनी या तरुणीचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली पण तरुणीचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पीडितेची बेपत्ता झाल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर शिरपूर पोलीस पथकाने बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान शिरपूर शहराजवळील देवमोगरा कॉलनीजवळील एका झाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती रविंद्र कोकणी नावाच्या तरुणाने पोलिसांना दिली होती.

यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची माहिती देणाऱ्या रविंद्र कोकणीची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा आरोपी कोकणीच्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली. यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. या गुन्ह्यात सुरेश पावरा आणि कृष्णा पावरा यांच्यासोबत आणखी एका तरुणाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ४ आरोपींनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. यानंतर या प्रकरणाचा मुख्य आरोपी रविंद्र कोकणी याने तरुणीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला अटक केली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

You might also like