नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून 30 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 30 वर्षीय तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नीलेश बाळासाहेब सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नीलेशच्या आईने आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत निखिल भावले या सावकारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निखिल भावले हा पैसे वसुलीसाठी नीलेशला सतत त्रास द्यायचा. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून नीलेशने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कुटुंबीयांनी म्हंटले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत नीलेश सोनवणे हा सातपूर येथील अशोकनगर भागात राहायचा. नीलेशला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशच्या मागे तगादा लावला होता. तो सतत पैशाची मागणी करायचा. यामुळे निलेशला मोठ्या प्रमाणात टेन्शन आले होते.

काही दिवसांपूर्वी सावकार भावले याने मृत नीलेश सोनवणे याची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश अधिक नैराश्यात गेला. यामुळे निलेशने आत्महत्या केली अशी तक्रार नीलेशच्या आईने आणि भावाने सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. यानंतर पोलिसांनी सावकार निखिल भावलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.