पाण्यात पडलेल्या सांबरास युवकांनी धाडसाने वाचविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड तालुक्यातील हेळगाव परिसरातून जाणाऱ्या आरफळ कालव्यात पडलेल्या सांंबराचा पाण्यातून बाहेर काढून जीव वाचवण्याचे काम येथील युवकांनी धाडसाने केले. त्यानंतर त्या सांंभराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, हेळगाव येथील शशिकांत शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी आरफळ कालव्यावर गेले होते. सध्या आरफळ कालवा भरून वाहत आहे. त्या मोठ्या प्रवाहाच्या पाण्यात सांबर जातीचा प्राणी पडला, असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहात जीव वाचवण्यासाठी व पाण्यातून बाहेर पडण्यासाठी सांबराची धडपड सुरू होती. अशा गंभीर परिस्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपल्या जवळच्या युवक मित्रांना फोन करून बोलावून घेतले. शिंदे यांच्यासह अवधूत पवार, यश पाटील, ओंकार जाधव, गणेश पाटील, जगदीश पवार, पवन जगदाळे, देवराज माळी आदी युवकांनी पाण्यात उडी घेत त्या सांबराला कालव्यातून काठावर बाहेर काढले.

वन विभागाला फोन करून सदर घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कराडचे वनक्षेत्रपाल ए. पी. गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेळगावच्या वनरक्षक मानसी निकम यांनी वनपाल भाऊसो जाधव, वनमजूर संभाजी मदने यांच्या सहकार्याने गोसावीवाडी नजीकच्या डोंगर पायत्यालगत असलेल्या वनीकरणात त्या सांबराला सोडून दिल्याचे सांगितले. हेळगाव येथील युवकांनी धाडसाने केलेल्या या कामाबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

युवकांची कामगिरी कौतुकास्पद…..

अलीकडे वन्य प्राण्यांच्या हत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना हेळगाव येथील युवकांनी सांबराचा जीव वाचवून केलेले काम कौतुकास्पद आहे, असे मत वनरक्षक मानसी निकम यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment