युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. ज्या युवक-युवतींना वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करुन येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही आणखीन बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख,उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, तहसीलदार आशा होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. जाधव आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी तृतीय पंथी, दिव्यांग यांचाही सहभाग घेतला जात आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रावर येण्यासाठी विविध सुविधा देण्यात येतात. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगून राष्ट्रीय मतदार दिनाच्या उपस्थितांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. मतदार नोंदणी सर्वांसाठी आवश्यक आहे. युवकांना 18 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी त्वरीत मतदार यादीत नाव नोंदणी करुन मतदार प्रकियेत प्रत्यक्ष सहभाग घ्यावा यामुळे देशाचा विकास होईल. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट असताना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी चांगले काम करुन नव मतदारांची नोंद केली आहे. लोकशाहीला आणखीन प्रगल्भ करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगितले.

मतदार नोंदणीत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी गेले वर्षभर जनजागृतीचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन या दिनानिमित्त प्रत्येक निवडणूकीत मतदान करावे असा निर्धार करा, असे प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्र वाटपाबरोबर मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडीच्या विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग या विषयावर पथनाट्य सादर केले.

Leave a Comment