औरंगाबाद | कोरोनाने रोजगार हिरावल्याने पैठण तालुक्यातील पुसेगाव येथील 28 वर्षीय तरूणाने घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नामदेव सुखदेव शिंदे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, नामदेव हा गावातच मिळेल ते मोल मजुरीचे काम करुन आईसोबत पुसेगाव येथे राहत होता. कोरोनामुळे शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही हातावर पोट असणाऱ्यांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नामदेव हा तणावग्रस्त होता. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने बुधवारी सायंकाळी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजार्यांनी घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्याला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन नामदेवला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेव्हा उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये नैराश्यातून आत्महत्या :
कोरोनाचा प्रभाव सर्वसामान्य जनतेत दिसुन येत आहे. लॉकडाऊन मुळे अनेक जणांचे रोजगार गेले, लोकांच्या हाताला काम मिळत नाही, वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेले कर्ज, हप्ते यामुळे नागरिक अडचणीत आले आहेत.या सर्व बाबींमुळे लोकामध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे म्हणून लॉकडाऊन
मध्ये लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.