हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नणंद भावजय यांच्यात लोकसभेला रंगतदार सामना झाल्यानंतर, आता पवार कुटुंबातील काका पुतण्या आमदारकीला एकमेकांच्या विरोधात भिडणारयत… पण ही काका पुतण्याची जोड जुनी नाही तर नवीनय…आम्ही बोलतोय ती जोड आहे…. युगेंद्र पवार वर्सेस रोहित पवार यांची…. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती आपलीच असं म्हणत सुनेत्रा ताईंना पुढे करून अजितदादांनी फिल्डिंग लावली, पण जनतेने कौल दिला तो सुप्रिया सुळे यांनाच… मधल्या काळात अजितदादांनी शरद पवारांपासून ते पवार कुटुंबातील जवळपास सगळ्यांनाच शिंगावर घेतलं, आता त्याचाच वचपा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) डायरेक्ट मुळावर घाव घालण्याच्या तयारीत आहेत… आणि तो घाव म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक… बारामतीचा पर्मनंट आमदार म्हणून अजितदादांची (Ajit Pawar) ओळख आहे… त्याच्याच जीवावर ते मंत्री झाले, उपमुख्यमंत्रीही झाले… बारामती अजितदादांना सेफ जाते म्हणूनच ते राजकारण करू शकतात… पण आता शांतीत क्रांती करत हिशोब चुकता करण्यासाठी अजितदादांच्या पुतण्याच्याच हातात आमदारकीला तुतारी देणार आहेत… काका पुतण्याच्या या संघर्षात आता शरद पवार पुतण्याच्या बाजूने ताकद लावतील… तशी त्यांनी सुरुवातही केली आहे… अजितदादांना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी कशी फिल्डिंग लावलीय? युगेंद्र पवार (Yugendra Pawar) या तशा नवख्या चेहऱ्याला अजितदादांच्या बालेकिल्ल्यातून निवडून आणणं खरंच सोप्प आहे का? बारामती विधानसभेला महत्त्वाचे फॅक्टर कोणते ठरतात? आणि सध्याच्या सिच्युएशनला विचार केला तर काका विरुद्ध पुतण्या या संघर्षात आघाडीवर कोण आहे? त्याचंच हे पॉलिटिकल ऍनालिसिस…
हाय व्होल्टेज बारामती लोकसभेचा निकाल लागला… काका की पुतण्या या संघर्षात जनता काकांच्या बाजूने उभी राहिली… सुप्रिया सुळे निवडून आल्या… सुनेत्रा पवार दीड लाखांनी पडल्या… त्यात बरीच भर म्हणून की त्यात भरीत भर म्हणून की काय अजितदादा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामतीतूनच तुतारीला 45 हजारांचं लीड मिळालं… सांगायचा मुद्दा असा की येणाऱ्या विधानसभेला अजितदादांची आमदारकीही धोक्यात आलीय… आपल्या बाजूने जाणारा हाच बोनस पॉइंट पाहून आता शरद पवारांनीही विधानसभेसाठी बारामती तुतारीच कशी वाजेल, याची तयारी सुरू केलीये… त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील जिरायती आणि बागायती पट्टयात प्रत्येक गावी जावून शेतकरी संवाद साधला… आणि सोबत लोकसभेला भरभरून मतदान केल्याबद्दल नागरिकांचे आभारही मानले… अजितदादांचे स्थानिक नेते जिथं पॉवरफुल आहेत अशा गावांमध्ये तर शरद पवारांचं जंगी स्वागत झालं… आणि नागरी सत्कारही झाला… पण या सगळ्या लाईनअप केलेल्या प्रोग्राममध्ये शरद पवारांच्या सोबत एक चेहरा होता तो म्हणजे युगेंद्र पवार…
शरद पवार जिथे जिथे जातील अगदी तिथे त्यांच्या बाजूलाच युगेंद्र पवार असायचे… अनेक ठिकाणी त्यांनी केलेली भाषणही चांगलीच गाजली… या सगळ्याचा अर्थ एकच निघतो येणाऱ्या आमदारकीला अजितदादांच्या विरोधात तुतारी कडून उमेदवार कोण असेल तर तो म्हणजे युगेंद्र पवार… अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा म्हणजे युगेंद्र पवार… राजकारणात हे नाव नवखं असलं तरी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव तसं मुरलेलं आहे… शरयू फाउंडेशनच्या मदतीने अनेक उद्योगसमूह सांभाळणं, सामाजिक काम करणं, विद्या प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे… पण पडद्याआड राहून काम करणारा हा चेहरा फ्रंटला आला तो लोकसभेच्या निमित्ताने…
आपल्या सख्या काकाने संघर्षाचा जो विस्तव पवार कुटुंबात पेरला त्याच्या विरोधात या पुतण्याने दंड थोपटला… आणि आपल्या आत्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला…सुरवातीला अजितदादा गटाकडून हे राजकारणातलं नवकोर पोरं करून करून काय करणार? असा डाऊट घ्यायला लागले… पण याच पोरानं बारामती विधानसभेचा पट्टा पिंजून काढला… प्रत्येक गावागावात जाऊन अपुरी यंत्रणा आणि स्थानिक नेत्यांची कमतरता असतानाही सभा घेतल्या, घोंगडी बैठका घेतल्या, मिळेल तसं जमेल तसं प्रचार करायला सुरुवात केली… नव्या दमाची विविध जाती-धर्मांची तरुण पिढी सोबत घेतली… सोशल मीडियापासून युथ विंग तयार करून पदांची वाटपणी केली… प्रचार सभांमधील भाषणातून हाच तरुण पोरगा दादांना जड जाऊ लागला… सोशल मीडियाच्या रिल्स मधून याच युगेंद्र दादाची हवा होती… रेवती सुळे आणि युगेंद्र दादा यांच्या प्रचारांच्या रिल्सने तर सोशल मीडिया व्यापून टाकला होता… एकट्या बारामती नीरा पट्ट्या बद्दल बोलायचं झालं तर सुप्रिया ताई इकडे फारशा फिरकल्याही नाहीत, इकडे तुतारीसाठी वन मॅन शो फिल्डिंग लावून बसला होता तो म्हणजे हाच युगेंद्र पवार… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून की काय अजितदादांनी प्रचाराच्या सांगता सभेत युगेंद्र पवारांना टार्गेट करत अनेक इशारे दिले… आरे तुरेची भाषा वापरली… त्याचाच रिवर्स इफेक्ट म्हणा की काय लोकसभेच्या निकालात बारामती मतदारसंघातून तब्बल 45 हजारांचं लीड सुप्रिया ताईंच्या पारड्यात पडलं… अर्थात यात खारीचा वाटा का होईना पण युगेंद्र पवार यांनाच जातो…
तसं अजितदादांना नडणं तसं सोप्पं काम नाहीये… पण ती हिम्मत दाखवली.. ती युगेंद्र पवार यांनीच… आणि आपल्यावर टाकलेला विश्वास पूर्णही करून दाखवला… मतदारसंघातून मिळालेल्या लीडने युगेंद्र पवार यांचा कॉन्फिडन्सही चांगलाच वाढला असेल… टेस्ट मॅच तर झाली आता वेळ आलीय ती फायनल मॅचची… आणि अशा वेळेस युगेंद्र पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील ते शरद पवार… येणाऱ्या विधानसभेला बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात आमदारकीसाठी पवार कुटुंबातला दुसरा सामना रंगेल… आणि तो तितकाच अटीतटीचा देखील असेल… पण इथून अजितदादांना हरवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये… विविध ग्रामपंचायतचे पॅनेल, स्थानिक नेते, कार्यकर्ते यांचं स्ट्रॉंग नेटवर्क दादांनी उभारलय… दादांचाच आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून या भागाशी जास्त संपर्क राहिलाय… म्हणूनच की काय अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पाडली त्याचं वाईट वाटलं असलं तरी त्यावर सोल्युशन म्हणून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे वाक्य इथल्या प्रत्येक जनतेच्या तोंडात होतं… थोडक्यात लोकसभेला जितकी हलकी फाईट झाली तितकी विधानसभेची नक्कीच नसेल….
अजितदादा हिंदुत्ववादी भाजप पक्षासोबत गेल्याने दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांची मतं ही तुतारीकडे वळली… त्यात सहानुभूतीची लाट होतीच… सुनेत्रा पवार म्हणावा असा स्ट्रॉंग कॅंडिडेटही नसल्याने लोकसभा एका बाजूला वळली… पण विधानसभेला रिंगणात असतील ते दस्तूरखुद्द अजित पवार…. पण त्यांची सलग सात टर्मची खासदार की आता धोक्यात आणणारय ते तेच त्यांचे काका शरद पवार… त्यांनी अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवार यांना सोबत फिरवून अजितदादांच्या विरोधात युगेंद्रच उभा राहील, याचा अप्रत्यक्ष मेसेजच बारामतीच्या जनतेला दिलाय… त्यात बारामतीच्या पट्ट्यातून फिरताना निंबुत, सोमेश्वर, वडगाव, कोऱ्हाळे यांसारख्या गावात जाऊन त्यांनी युगेंद्र पवारांसाठी बिल्डिंग लावल्याचंही बोललं जातंय… लोकसभेला सुप्रियाताईंच्या पाठीशी उभ राहण्यासाठी शरद पवारांनी या मतदारसंघातील जुन्या जाणत्या तर कधी विरोधातल्याही राजकीय मित्रांच्या गाठीभेटी घेत बरंच मतदान फिरवलं विधानसभेलाही युगेंद्र पवार यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शरद पवार आपल्या नातवासाठी नक्कीच फिल्डिंग लावतील, असं सध्या तरी चित्र दिसतंय… विधानसभा हरली तर अजितदादांचं राजकीय करिअर संपुष्टात येऊ शकतं… त्यामुळे बदला घेतला जाणारच… असं म्हणत शरद पवार आता पवार कुटुंबात नव्या काका पुतण्याच्या संघर्षाला ग्रीन सिग्नल देतील का? बारामतीची जनता आमदार म्हणून कोणत्या चेहऱ्याला पसंती देतील? युगेंद्र पवार की अजित पवार? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.