जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे. यात जिल्हा परिषदेसाठी 70; तर पंचायत समित्यांसाठी एकूण 140 गण निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रशासकीय स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही नांदी समजले जात आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ. गो. जाधव यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे. वर्ष 2022 चा महाराष्ट्र अधिनियम सुधारित तरतुदीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तयार करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला आहे. तो तपासणीकरिता राज्य निवडणूक कार्यालयाने मागविला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेची हार्ड व सॉफ्ट कॉपी, नकाशे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या 62 जिल्हा परिषदेचे गट आहेत. आता ही संख्या आठने वाढणार आहे. त्यामुळे गटांची संख्या एकूण 70 होणार आहे. पंचायत समित्यांचे 124 गण असून आता त्यात 16 गणांची वाढ होणार असून आता एकूण गणांची संख्या 140 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात मुदत संपत असल्याने काही दिवस जिल्हा परिषदेचे काम प्रशासकांच्या हाती जाणार अशी चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र पाठविले असून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम पाठविण्याच्या सूचना केल्या आहे. जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे.

या तालुक्यात वाढले गट –
जिल्ह्याचा नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यांत प्रत्येकी २ तर फुलंब्री, पैठण, कन्नड व गंगापूर तालुक्यांत प्रत्येकी १ असे आठ जिल्हा परिषदेचे गट वाढले आहेत.

तालुकानिहाय गट – गणांची संख्या
औरंगाबाद – 10 – 20
पैठण – 9 – 18
खुलताबाद – 3 – 6
वैजापूर – 7 – 14
गंगापूर – 9- 18
सोयगाव – 3 – 6
सिल्लोड – 8 – 16
कन्नड – 8 – 16
फुलंब्री – 4- 8

Leave a Comment