व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये; नक्षलप्रभावीत प्रदेशातील जि.प. सदस्याचं भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे सुरु असलेलेल्या लोहखदाणीला स्थानिक नागरिक आणि आदिवासींनी विरोध केला आहे. हजारो हॅक्टर जमिन अन् लाखो झाड यामुळे तोडली जाणार आहेत. भारतीय संविधान, पेसा कायदा आदींची पायमल्ली करुन लोहखदान सुरु असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. आमचा विरोध विकासाला नसून पर्यावरणाचा र्‍हासाला आहे. शाश्वत विकासाची मागणी करत आदिवासींनी पुकारलेल्या खदाणीविरोधातील लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन जि.प. सदस्य लालसू नोगोटी यांनी केले आहे. लालसू नोगोटी यांची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे

नमस्कार, आज एका अतिशय महत्वाच्या विषयावर आपणा सर्वांना मी एक आवाहन करत आहे. आज आम्हाला आपली साथ हवी आहे. गडचिरोलीतील माडियाला आज आपल्या पाठींब्याची गरज आहे. अन् इथल्या मूलनिवासी असणार्‍या आदिवासींना तुम्ही सोबत द्याल याचा मला पुर्ण विश्वास आहे. मी सदर मदत कशाबाबत मागत आहे हे थोडक्यात खाली लिहित आहे. मी ज्या समाजातून आलो त्या माडिया या अतिअसुरक्षित आदिवासी समाजाने माझ्या आसपासचं जंगल आजवर राखून ठेवलं आहे. शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो अन् आमचं सर्वकाही या निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आमचा निसर्ग आमच्यापासून उचलून, मोडून, तोडून जेसीबी..क्रेन वगैरे मशिनीची सहाय्याने चोरुन घेऊन जाण्याचे कारस्थान काहींनी रचले आहे. आम्ही भारताचे संविधान मानणारे लोक आहोत. या अन्यायावोरोधात लढताना या संविधानातील कायदेही आमच्याच बाजूने आहेत. पेसा कायदा तसेच वनहक्क कायदा यामुळे श्येड्युल एरियातील (पाचवी अनुसूची) काही हक्क आमच्याकडे आहेत. याद्वारा ग्रामसभांची संमती घेणे शासनासह सर्व खाजगी कंपन्यांना बंधनकारक आहे. आम्ही आमच्या हक्क व अधिकारांसाठी जागरुक होऊन लढत आहोत. मात्र ग्रामसभांना विश्वासात न घेता..आमचे दमन सुरु आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड पहाडासह एकुण 25 लोहखाणी प्रस्तावित आहेत. यातील सुरजागड येथे लोयड अँड मेटल्स कंपनी, त्रीवेणी अर्थमुव्हर्स कंपनी बेकायदेशीररित्या आमच्या जंगलातील झाडे तोडून, डोंगर पोखरुन लोह घेऊन चालले आहेत. आम्ही यावर जिल्हाप्रशासन, राज्यपाल, सदर खात्याचे मंत्री अशा सर्वांना निवेदने दिली. मात्र आम्हाला न्याय मिळत नाहिये. त्यामुळे 25 Oct 2021 रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन देत एटापल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

पर्यावरणाचा जगभर र्‍हास सुरु असताना त्याचे दुष्परिणाम आपण पाहतच आहोत. ज्या आदिवासींनी आजवर जंगल जपून ठेवत निसर्गाला जिवंत ठेवण्याचं काम केलं आज त्या आदिवासींकडून त्याचं जंगल हिसकावून घेण्याचा प्रकार सुरु आहे. एकवेळ तोडलेली झाडे लावता येतीलही पण चोरीला गेलेला डोंगर कसा बांधणार? तेव्हा मी आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व जनतेचा, माडिया आदिवासींचा प्रतिनिधी म्हणुन आपल्याला आवाहन करतो की आपण आमच्या खदानी विरोधातील बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा. ज्या निसर्गाचा आपण भाग आहोत त्या निसर्गाच्या बाजूने उभे राहून शास्वत विकासाची मागणी करत खदानीला विरोध करावा.

आज गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम गावांतील शिक्षित, अशिक्षित आदिवासीही निसर्ग वाचवण्यासाठी लोहखदानीला विरोध करत जोपर्यंत खदान बंद होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही अशी भुमिका घेऊन एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आपण आपआपल्या परिने आम्हाला सोबत द्यावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी इथे येऊन आपला पाठिंबा दर्शवावा. आपण फेसबुक, ट्विटरवर एक पोस्ट लिहून आमचा आवाज बनू शकता. तसेच आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना यांना आवाहन करतो की आपणही आमची बाजू समजून घेऊन आम्हाला पाठिंबा द्यावा. जर आज आपण फक्त पाहत बसलो, शांत राहिलो तर पुढच्या ३० वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधीक जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलं गायब होतील. पहाड उद्वस्त झाल्यानं झरे, नाले, नद्या कोरड्या पडतील. येथील जैवविविधता नष्ट होईल. जंगलाचा राजा असणारा आदिवासी गुलाम बनून जाईल. तेव्हा जंगल वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी आम्हाला आपली साथ द्या. आमची सोबत करा.

एड. लालसू नोगोटी
सदस्य, जिल्हास्तरीय महाग्रामसभा स्वयत्त परिषद, गडचिरोली तथा सदस्य, भामरागड पट्टी पारंपारिक इलाका गोटूल समिती, भामरागड तथा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा गडचिरोली.

संपर्क : 09405130530
082758 74405
ईमेल: [email protected]

#standforsurjagad
#standfornature
#StopMining