विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोरखेळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असून सत्तास्थापन करण्याबाबत भाजपकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत. भाजपकडून आमदार फोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर नाशिकमधील आमदारांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळीच दिली. यामुळे सत्तेची खुर्ची आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आणखी कोणत्या खेळया करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
युतीमधील आपला ३० वर्ष सहकारी असणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद न देऊन भाजपने कोत्या मनोवृत्ती दाखवली असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं आहे. २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपला यंदा मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने चांगलंच कोंडीत पकडलं आहे. हाती आलेलं मुख्यमंत्रीपद आता जाऊ द्यायचं नाही असाच चंग शिवसेनेनं बांधला असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या असतील तर त्यांनी खुशाल सत्तास्थापनेचा दावा करावा असं वक्तव्य सामानाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
सत्तास्थापन करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याचं भाजपला आता कळून चुकलं आहे. या परिस्थितीत आम्ही कुणालाच भीक घालणार नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही हा शिवसेनेचा सूचक इशारा राज्यातील नवं सत्तासमीकरण पुढं घेऊन आला आहे. आता युतीचं सरकार स्थापन व्हायचं असेल तर भाजपला शिवसेनेची अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची अट मान्य करावी लागणार एवढं मात्र नक्की..!!