कोल्हापूर प्रतिनिधी | पूरग्रस्त भागातील ‘शेती कर्ज माफी’ च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार यावर्षी जुलै ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांवरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख होता. आता त्या ऐवजी या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे दिली.
सांगली, कोल्हापूर सह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीय कृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे,’ असेही पाटील यांनी सांगितले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे. अशी माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली.