सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
संपूर्ण राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे याच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी बुधवारी जिल्हा न्यायालयात याप्रकरणातील पंच असणारे सांगली महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक श्रीपाद बसूदकर यांची साक्ष पूर्ण झाली. बासुदकर यांनी घटनेतील प्लास्टिकची पाईप आणि प्लास्टिकची बादली या दोन्ही वस्तू ओळखल्या. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाले आहे.
आज सुनावणीवेळी या प्रकरणातील सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भास्कर यांना तुम्ही कोणकोणत्या वस्तू पाहिल्या आणि त्या ओळखू शकाल काय? असा सवाल केल्यावर बासूदकर यांनी हो म्हटले. त्यांनी प्लास्टिकची बादली आणि प्लास्टिकची पाईप या दोन्ही वस्तू ओळखल्या. बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारावर प्रश्नांची सरबत्ती केली. सांगली पोलिसांनी लॅपटॉपवर त्यांना योग्य वाटेल असा पंचनामा तयार केला होता हे बरोबर आहे ना? असे विचारल्यावर पंचांनी नाही, असे उत्तर देऊन पंचनामा आमच्यासमोर केला आहे असे सांगितले.
बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगली शहर पोलीस ठाण्यातील विविध खोल्या विषयी माहिती विचारली. बचाव पक्षातर्फे एडवोकेट गिरीश तपकिरे, एडवोकेट सिडी माने, एडवोकेट दीपक शिंदे, एडवोकेट प्रमोद सुतार, एडवोकेट दिलीप शिरगावकर, एडवोकेट शिरगुप्पे यांनी काम पाहिले. बसूदकर यांनी वस्तू ओळखल्यानंतर बचाव पक्षाने तुम्ही खोटे बोलताय त्या वस्तू तुमच्या समोर पोलिस ठाण्यात जप्त केल्या नाहीत असे वधवुन घेण्याचा प्रयत्न केला. कोथळे प्रकरणातील पुढील सुनावणीची तारीख ६ जानेवारी आहे.