दिल्ली प्रतिनिधी | भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनणार असल्याचं कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे. या निकालात सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई, नवनिर्वाचित सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. चंद्रचूड यांच्यासहित आणखी २ न्यायमूर्ती या निकलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रंजन गोगोई यांच्याकडून या निकालाचं वाचन सुरु झालं असून निर्मोही आखाड्याची मागणी सुरुवातीलाच फेटाळण्यात आली आहे. शिया वक्फ बोर्डाचा दावाही फेटाळण्यात आला आहे. रामलल्लाला या निकालात पक्षकार मानण्यात आलं असून ऐतिहासिक पुरावे मांडण्याचं कामही यावेळी गोगोई करत आहेत.
२.७७ एकर जागेचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेले ३ तुकडे ही गोष्ट चुकीची असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड आणि रामलल्ला हे दोनच पक्षकार असल्याचं निकालाच्या एकूण वाचनातून लक्षात आलं आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा देणंही गरज असल्याची महत्वपूर्ण टिप्पणी रंजन गोगोई यांनी केली.