दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज जदयुची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सोबत राहण्याचा ठराव संमत झाला आहे. आम्ही भाजपाच्या सोबत राहू परंतु भाजपने आम्हाला दुर्लक्षित केल्यास भाजपला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असे नितीशकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत जदयु ला दोनच जागा मिळाल्या होत्या. त्याउलट भाजपला २२ जागी विजय मिळाला होता. या निकालावर आधारित जागावाटपास आम्ही तयार नाही कारण आम्ही २०१४ साली एकटे लढून सुद्धा १७% मते घेतली होती. तसेच विधान सभा निवडणुकीमधील कामगिरी लक्षात घेऊनच जागा वाटप करण्यात यावे असेही नितीशकुमार यांनी यावेळी म्हणले अाहे.
राजकीय विचारवंतांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपतील आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटतील आणि नंतरच आपला निर्णय जाहीर करतील असे बोलले जात होते. परंतु या संभावतेला नितीशकुमार यांनी छेद दिला असून त्यांनी अमित शहा यांना भेटण्या अगोदरच आपला निर्णय जाहीर केला आहे. २२ राज्यांच्या जदयु प्रतिनिधीं सोबत आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसोबत केलेल्या सल्ला मसलतीच्या सहाय्याने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले आहे. नितीशकुमारांच्या या निर्णयामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व, कॉग्रेस सोबत आघाडी इत्यादी चर्चांना मुठमाती मिळाली आहे.