आरे वृक्षतोडीला राज ठाकरेंचा विरोध; लता मंगेशकर देखील सरसावल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र |मेट्रो ३ या प्रकल्पासाठीची कारशेड मुंबईतील आरे कॉलनीत उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी सुमारे २७०० झाडं तोडली जाणार आहेत या निर्णयाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नाही तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करुन आरे मधील वृक्षतोड निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे असं म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी स्वतः आवाज दिलेला एक व्हिडिओच मनसेने ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी जंगलामुळे किंवा एखाद्या पार्कमुळे शहराचं, राज्याचं आरोग्य कसं चांगलं राहू शकतं ते सांगितलं आहे. मॅनहटन येथील एका पार्कचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. त्याच धर्तीवर त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं उदाहरण दिलं आहे. “न्यूयॉर्कमध्ये पार्क उभारावं लागलं. आपल्याला निसर्गाने हा ठेवा दिला आहे मात्र आपणच त्याचा ऱ्हास केला आहे. बिबळ्या घरात शिरला असं आपण म्हणतो पण तसं नाही आपण त्याच्या घरात शिरलो आहे” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

तसंच आरे मधील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.तसेच “मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २७०० झाडं कापण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वन्यजीव धोक्यात येणार आहेत मी या वृक्षतोडीचा निषेध करते” असे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हणले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार आरेमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे, श्रद्धा कपूर यांचाही समावेश आहे. अशात आता राज ठाकरे आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवत आरे मधील वृक्षांची कत्तल थांबवा असं म्हटलं आहे. 

 

 

Leave a Comment