दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने या देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले आहे असा आरोप काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावरील जनआक्रोश रेलीमधे ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधुन भाषण करत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोठमोठाली आश्वासने देतात परंतु त्यातील कोणतेच आश्वासन सत्यात उतरवत नाहीत. परिणामी जनतेच्या मनामधे सरकारप्रती असणारी विश्वासार्हता आता कमी झाली आहे. पंतप्रधान जेव्हा भाषण करत असतात तेव्हा एकणारे लोक पंतप्रधानांच्या भाषणात काही तरी सत्य सापडतंय का हे शोधत असतात’ असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर राजधानी दिल्लीमधील त्यांचे हे पहीलेच भाषण होते.
‘मोदी जिकडे जातात तिकडे गरीबी, भ्रष्टाचार, विकासावर बोलत असतात परंतु त्यांच्या बोलण्यात थोडीही सत्यता नसते. कर्नाटक राज्याचे भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन तुरुंगात जावून आले आहेत. रेड्डी बंधू आणि येदियुरप्पा या भ्रष्टाचाराचे आरोप असणार्यांच्या मधे उभे राहून नरेंन्द्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची बात करतात यामधेच त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो’ असेही ते म्हणाले. भष्टाचाराच्या मुद्यावरुन गांधी यांनी पियुष गोयल व नीरव मोदी यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला केला. सध्याच्या सरकारबाबत जनतेच्या मनामधे असंतोष खदखदत असून मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकींमधे काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.