जोधपूर : स्वयंखोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापू अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर येथील विशेष एस.सी. – एस.टी. न्यायालयाने आसाराम यास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल ऐकून आसारामला अश्रू अनावर झाले. गेली साडे चार वर्षे जोधपूर सेंट्रल जेलमधे असलेला आसाराम याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. १५ आॅगस्ट २०१३ रोजी जोधपूर जवळच्या मनाई येथील आश्रमामधे बलात्कार करण्यात आला असल्याचे तक्रारदार मुलीने म्हणले आहे. नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसारामसह त्याच्या इतर ૪ सहकार्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून चार राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसारामसोबतच्या चार सहआरोपींपैकी शिल्पी व शरदचंद्र यांनी बलात्कार प्रकरणामधे आसाराम यास साथ दिल्याचे न्यायालयीन चौकशीमधे स्पष्ट झाले असून त्यांना प्रत्तेकी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवा व प्रकाश यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.