उस्मानाबाद प्रतिनिधी : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेवरच ‘तीर’ मारला. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंतांनी भाजपला साथ दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.
उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राणा पाटील तर शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौघुले यांचे गट एकत्र आले. तानाजी सावंत यांनी पुतणे धनंजय सावंत यांना भाजपच्या गोटातून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. निवडणुकीत 30 विरुद्ध 24 मतांनी त्यांचा विजय झाला. तानाजी सावंत यांनी थेट पक्षविरोधी हत्यार उपसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र संभ्रमाचं वातावरण होतं. राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी राणा पाटील व शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. निवडणुकांआधीपासूनच दोघांमध्ये टशन पाहायला मिळाली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी 26, शिवसेना 11, काँग्रेस 13, भारतीय जनता पक्ष 04 आणि अपक्ष 01 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील हे आमदार झाल्याने एक जागा रिक्त झाली असून सेनेचे संख्याबळ 10 झाले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी आणि भाजप यांची शिवसेनेच्या दोन बंडखोर सदस्यांच्या पाठिंब्याने एकत्र सत्ता होती अध्यक्ष व उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे होते तर मात्र आता अध्यक्ष भाजपचा असणार आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे एकत्र झाल्यास महाविकास आघाडीची सत्ता सहज शक्य होती. मात्र राष्ट्रवादीतील गळती आणि शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांतील वाद आणि असमन्वयामुळे समीकरण जुळणं कठीण मानलं जात होतं. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केल्याने दोघांमध्ये सध्या टोकाचं वितुष्ट आहे. त्याचा परिणाम या निकालावर दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाचा विश्वासघात करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.