नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये एअर इंडिया कंपनीच्या भवितव्याबाबत अतिशय महत्त्वाचं विधान केलं. जवळपास ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं खासगीकरण झालं नाही तर, लवकरच कंपनी बंद करावी लागणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. एअर इंडिया संदर्भातील प्रश्नाला उत्तर देत त्यांनी ही वस्तुस्थिती सर्वांपुढे ठेवली.
विमान संशोधन विधेयक 2020 राज्यसभेत सादर करतेवेळी त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ज्यामध्ये त्यांनी एअर इंडियाचं खासगीकरण किंवा कंपनी बंद करणं हे दोनच पर्याय समोर असल्याचं स्पष्ट केलं. कंपनी बंद करण्याची परिस्थिती समोर असतानाच येत्या काळात नवा मालक मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
राज्यसभेत पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून सद्यस्थिपर्यंत केंद्राने एअर इंडियामध्ये ३० हजार कोटी रुपयांहून जास्तीची गुंतवणूक केली आहे. परिणामी ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही.
मुळात एअर इंडिया ही कंपनी विकत घेणाऱ्यांना कंपनीवर असणारं कर्जसुद्धा घ्यावं लागणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीवरील बोलीसाठीचं मुल्य हे तिच्या मुळ अस्तित्वावर नसून एंटरप्राईज मुल्यावर असल्याचंही सांगण्यात येत आहे. परिणामी एअर इंडियाया कंपनीच्या भवितव्यासाठी आता बोली लावण्याची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळं इच्छुक कंपनी एअर इंडियासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत बोली लावू शकणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.