कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंदकर (स्पेशल रिपोर्ट)

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात ज्यादा लाभाचे आमिष दाखवून 8 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून कडकनाथ प्रश्नी हजारो शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहेत.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून ‘रयत ऍग्रो’ या कंपनीने कोल्हापूर, सांगली,सातारा ,सोलापूर सह राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उचलले आहेत. मात्र अवघ्या काही वर्षांत कंपनीने आपली प्रमुख कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास साडे तीन हजार लोकांनी आठ ते दहा कोटींची गुंतवणूक यात केली आहे. मात्र आता संस्थेने हात वर केल्याने हे सर्व गुंतवणूकदार एकवटले आहेत. संस्थेकडून सर्व देणी चूकवण्याचा दावा केला जात असला तरी यावर आता गुंतवणूकदारांचा विश्वास नसल्याने येत्या काळात या विरोधात आवाज उठवून आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे. रयत ऍग्रो या संस्थेचा पश्चिम महाराष्ट्रातील विस्तार पाहता  ५०० कोटींचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

फसवकणूक झाल्यानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींत सापडले आहेत. सागर दिंडे या शेतकऱ्याने सुद्धा पैसे गुंतवून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला होता परंतु आता फसगत झाल्याने आर्थिक संकट त्यांच्या पुढे उभे राहिले आहे. आपली परिस्थिती सांगताना सागर दिंडे म्हणाले की, ”सध्या गुंतवणूकधारकांना कोंबड्यासाठी लागणारे खाद्य दिले जात नाही. अंड्यांची उचल होत नाही. ग्राहक हवालदिल झाले आहेत. स्थानिक बाजारपेठेत या प्रकारच्या कोंबड्याना आणि अंड्याना मागणी नसल्याने आता नेमके करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे आता न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे.”

मारुती पाटील या फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला याबाबत विचारणा केली असता खुद्द राज्याचे कृषीराज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकाचा या फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. पाटील सांगतात की, ”सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्ही पहिली नसेल. मात्र अंड्याला सोन्याचा भाव देणारी कोंबडी घेऊन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा एक नातेवाईक बाजारात उतरला आणि कडकनाथ नावाची कोंबडी घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला.”

सध्या सांगली जिल्हा रयत क्रांतीचा युवक अध्यक्ष असलेल्या मोहिते नावाच्या या व्यक्तीने राज्यभर आपले जाळे विस्तारात ज्यादा परताव्याचे अमिश दाखवत लोकांची लुबाडणूक केली आहे. या सगळ्यांच्या पाठीमागे सदाभाऊ खोत यांचा हा नातेवाईक असल्याचा आरोप होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही सदाभाऊ खोत यांच्या या कनेक्शनचा उलघडा करत प्रकरणाची चौकशी करून संबंधितांची बँक खाती सील करण्याची मागणी केली आहे

Leave a Comment