कोल्हापूर प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचार घोटाळे ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सांगली इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्यासह शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर सुद्धा या कोंबडी भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढू लागलेली आहे. कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचारात शाहूवाडी तील शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक झाली असून रयत ऍग्रो कंपनी ने कडकनाथ कोंबड्यांच्या नावाखाली सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कुकुट पालन करणाऱ्या शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील रयत ऍग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवले होते. त्यामुळे ग्रामीण भागातही ही या भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढू लागली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील अरुल, मोळावडे ,टेकोली, करंजफेन, नांदगाव, नांदारी, बांबवडे, कोतोली वाडीचरण, सह पंचवीस गावातील तरुण शेतकऱ्यांनी रयत ऍग्रो कंपनी कडे 75 हजार ते दोन लाख रुपये भरून पक्षी विकत घेतले. कंपनीने पहिल्या महिन्यात पन्नास रुपये प्रमाणे अंडी उचलली दुसऱ्या महिन्यात कंपनी अंडी नेण्यास टाळाटाळ करू लागली. शेतकऱ्यांनी या गुंतवणुकीसाठी बँकांचे कर्ज काढल्यामुळे बँकांचा तगादा कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे लागला आहे. शाहूवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी गेले होते.
यावेळी शेतकऱ्यांनी रयत ऍग्रो कंपनी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे पैसे भरले असल्यामुळे कंपनीविरोधात इस्लामपूर येथे गुन्हा दाखल करावा. असे शाहूवाडी चे पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. तसेच त्यांचे तक्रार अर्ज घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. व वरिष्ठांशी संपर्क साधला आहे. रयत ऍग्रो कंपनी च्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे एकच खळबळ माजली असून शेतकरी हवालदील झाले आहेत. शेती व दुग्ध व्यवसाय याबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनासाठी शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. परंतु शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.