सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील बुधवार पेठेत मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या गोळाबारात एकजण ठार झाला आहे. पवन दीपक सोळवडे (वय 24, रा. बुधवार पेठ) असे संबधित युवकाचे नाव आहे. मयतपवन सोळवडेच्या घरात घुसूनच गोळीबार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिल्मी स्टाईलने झालेल्या या गोळीबारात पवनवर तब्बल अकरा गोऴ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळीबारानंतर बुधवार पेठ व मंडई परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावास पांगवले. पूर्वीच्या अंतर्गत वादातून हा खून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. गुंडगिरीच्या वर्चस्ववादातून हा प्रकार झाल्यामुळे बाजूच्या परिसरातील शिवराज इंगवले, समीर मुजावर व जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांचा संशय आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे शहरात मोठया प्रमाणावर तणाव असून बुधवार पेठ परिसरात काही ठिकाणी दगडफेकही झाली आहे.