‘कर्तारपूर’मध्ये व्हिसा शिवाय प्रवेश ; भारत आणि पाकिस्तान मध्ये सहमती

0
28
संग्रहीत छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था |शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही.

पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या या गुरुद्वाऱ्यामध्ये शीख भाविकांना प्रवेश देण्याविषयी अनेक वर्षांपासून चर्चा होत होती. पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही बाजूंकडून त्यावर चर्चा सुरू झाली.

अमृतसर जिल्ह्यातील अट्टारी येथे बुधवारी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी भाविकांना प्रवेश देण्यासाठी शुल्क लावण्याचा पाकिस्तानचा आग्रह होता त्याला भारताने आक्षेप घेतला तसेच गुरूद्वाराच्या आवारामध्ये भारतीय राजनैतिक किंवा राजशिष्टाचार अधिकारी असावा असे भारताचे म्हणणे आहे, तर पाकिस्तानचा त्याला विरोध आहे. पाकिस्तानने त्यांच्या या भूमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन भारतीय अधिकाऱ्यांनी केले. या बैठकीमध्ये कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात यश आले नाही असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास यांनी सांगितले.

भारतीय भाविकांना या गुरूद्वाऱ्यापर्यंत व्हिसा न घेताही प्रवेश देण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. त्यामध्ये अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. दररोज ५००० भाविक या गुरूद्वाऱ्याला भेट देऊ शकतील तसेच विशेष दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते. पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या सुविधांवर ही संख्या निश्चित होणार आहे. आठवड्यातील सातही दिवस हा कॉरिडॉर सुरू राहणार असून, गटाने किंवा वैयक्तिकरीत्या या गुरूद्वाऱ्याला भेट देण्याची मुभा भाविकांना असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here